सुरक्षा सूचना व फसवणुकीपासून बचाव

ही वेबसाइट फक्त ओळख करून देते. पुढची सगळी चौकशी तुम्ही व तुमच्या कुटुंबाने करायची आहे. खालच्या सूचना शांतपणे वाचा, आणि शक्य असल्यास घरातल्या मोठ्या माणसांना वाचून दाखवा.

संस्था काय करते, आणि काय करत नाही

  • संस्था फक्त वधू-वरांची ओळख करून देते.
  • प्रोफाईलमधली सगळी माहिती सदस्यांनी स्वतः लिहिलेली आहे.
  • संस्था कागदपत्रं, वय, शिक्षण, नोकरी, उत्पन्न, जमीन, जात, आरोग्य, वैवाहिक स्थिती किंवा चारित्र्य यापैकी काहीही तपासत नाही.
  • नोंदणी होताच प्रोफाईल इतरांना दिसू लागतं. ॲडमिन ते नंतर बघतो — आधी तपासणी होत नाही.
  • हिरवं ✓ चिन्ह म्हणजे ॲडमिनने प्रोफाईल एकदा नजरेखालून घातलं आहे, एवढंच. ती हमी नाही.
  • मोबाईल पडताळणी म्हणजे फक्त तो नंबर त्या व्यक्तीकडे आहे एवढंच — नाव किंवा ओळख खरी असल्याचा पुरावा नव्हे.
  • सदस्यत्व फी फक्त संपर्क बघण्यासाठी आहे. त्यात पडताळणी, हमी किंवा लग्न जुळण्याची खात्री नाही.
  • कोणत्याही स्थळाची जबाबदारी संस्था घेत नाही.

फसवणुकीचे नेहमीचे प्रकार — हे ओळखा

  • खोटा फोटो, खोटी ओळख — फोटो दुसऱ्याचाच असू शकतो. बोलणं पुढे नेण्याआधी व्हिडिओ कॉल करा. टाळाटाळ होत असेल तर तिथेच थांबा.
  • परदेशातलं खोटं स्थळ — दुबई, लंडन, अमेरिकेत मोठा पगार सांगितला जातो पण प्रत्यक्ष भेट कधीच होत नाही. पासपोर्ट, व्हिसा व नोकरीचं पत्र मागा आणि भारतातलं घर प्रत्यक्ष जाऊन बघा.
  • गिफ्ट विमानतळावर अडकल्याचं सांगणं — परदेशातून सोनं किंवा पैसे पाठवले आहेत, ते विमानतळावर अडकले आहेत असं सांगून सरकारी कराच्या नावाखाली पैसे मागितले जातात. असे पैसे कधीच भरू नका.
  • आधीच पैसे मागणं — व्हिसा, तिकीट, दवाखाना अशी तातडीची कारणं सांगितली जातात. या वेबसाइटवरून ओळख झालेल्या कुणालाही, कोणत्याही टप्प्यावर एक रुपयाही पाठवू नका.
  • डिजिटल अरेस्ट व पार्सलचा घोटाळा — पोलीस, CBI किंवा कुरिअरचा माणूस असल्याचं सांगून घाबरवलं जातं. पोलीस कधीच व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत. फोन कट करा, घरच्यांना सांगा व १९३० वर तक्रार करा.
  • गुंतवणूक व ट्रेडिंगचं आमिष — ॲपवर पैसे गुंतवायला लावतात, सुरुवातीला थोडा नफा दाखवतात आणि नंतर सगळे पैसे अडकतात. स्थळ बघताना असा विषय निघाला की समजा — ही फसवणूक आहे.
  • हुंड्याची मागणी — आधी काहीच नको म्हणतात, लग्न जवळ आलं की सोनं, गाडी व खर्च मागतात. मागणी करणं हाच गुन्हा आहे. स्थळ नाकारा.
  • आधीचं लग्न, घटस्फोट किंवा मुलं लपवणं — घटस्फोट झाला असल्यास कोर्टाच्या निकालाची मूळ प्रत मागा आणि गावात जाऊन चौकशी करा.
  • पोलीस केस लपवणं — त्या व्यक्तीलाच स्वतःचा पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला काढून दाखवायला सांगा. दुसऱ्या माणसाच्या नावाचा दाखला तुम्हाला काढता येत नाही. सोबत गावातील प्रतिष्ठित माणसांकडे शांतपणे चौकशी करा.
  • नोकरी, पगार, जमीन व शिक्षणाबद्दल खोटं — पगारपत्रक किंवा ITR, कंपनीचं ओळखपत्र, मूळ प्रमाणपत्रं आणि जमिनीचा ७/१२ मागा. ७/१२ महाभूलेख वेबसाइटवर स्वतः तपासा.
  • खाजगी फोटो मागून ब्लॅकमेल — कुणालाही खाजगी फोटो किंवा व्हिडिओ पाठवू नका. असं घडलंच तर पैसे देऊ नका, स्क्रीनशॉट जपून ठेवा आणि लगेच तक्रार करा.
  • चॅटचे स्क्रीनशॉट दाखवून धमकी — घाबरून पैसे देऊ नका आणि नाइलाजाने होकारही देऊ नका. घरच्यांना लगेच सांगा व पोलिसांत तक्रार करा.
  • एकटं भेटण्याचा आग्रह — ओळख नुकतीच झालेली असताना एकटं, दुसऱ्या शहरात किंवा हॉटेलवर भेटायला बोलावलं जातं. स्पष्ट नकार द्या.
  • संस्थेच्या नावाने एजंटला पैसे — कोणी खाजगी नंबरवर किंवा QR कोडवर फी मागत असेल तर देऊ नका. फी फक्त या वेबसाइटवरील अधिकृत पेमेंटनेच भरा.
  • OTP, बँक तपशील व आधार क्रमांक मागणं — OTP आणि पिन कुणालाही सांगू नका. संस्था, बँक किंवा पोलीस कधीच विचारत नाहीत.
  • घाईने लग्न लावून दागिने घेऊन पळणारी टोळी — घाईचं लग्न टाळा. गाव, घर व जवळचे नातेवाईक प्रत्यक्ष बघा आणि लग्नाची रीतसर नोंदणी करा.
  • आजार किंवा व्यसन लपवणं — दोघांनीही लग्नापूर्वी वैद्यकीय तपासणी करून अहवाल एकमेकांना मोकळेपणाने दाखवा.
  • बनावट लिंक व खोटी पेमेंट पानं — मेसेजमधली कोणतीही लिंक उघडू नका. वेबसाइटचा पत्ता स्वतः टाइप करून उघडा आणि पैसे फक्त तिथूनच भरा.
  • घाई करणं व लगेच वेबसाइटबाहेर बोलणं नेणं — घाई हीच फसवणुकीची पहिली खूण. वेळ घ्या, घरच्यांशी बोला, चौकशी करा.

लग्नाआधी हे स्वतः बघा

  • आधार कार्ड व पॅन कार्ड — मूळ कागद हातात घेऊन बघा.
  • शाळा सोडल्याचा दाखला — खरी जन्मतारीख व वय यातूनच कळतं.
  • शिक्षणाची मूळ प्रमाणपत्रं व गुणपत्रिका.
  • नोकरीचं ओळखपत्र व शेवटच्या तीन महिन्यांचे पगारपत्रक, किंवा ITR.
  • स्वतःचा व्यवसाय असल्यास — दुकानाची नोंद, GST क्रमांक व बँक स्टेटमेंट.
  • जमिनीचा ७/१२ व ८-अ उतारा — महाभूलेख वेबसाइटवर स्वतः तपासा. कर्ज किंवा बोजा आहे का तेही तिथेच दिसतं.
  • घटस्फोट झाला असल्यास — कोर्टाच्या निकालाची प्रत.
  • जोडीदाराचा मृत्यू झाला असल्यास — मृत्यू दाखला.
  • आधीच्या लग्नातील मुलं आहेत का — स्पष्ट विचारा.
  • वैद्यकीय तपासणी अहवाल — रक्तगट, थॅलेसेमिया, HIV, साखर.
  • परदेशातलं स्थळ असल्यास — पासपोर्ट, व्हिसा व तिथल्या कंपनीचं नोकरीचं पत्र. तिन्ही नसतील तर पुढे जाऊ नका.
  • शक्य असल्यास — त्या व्यक्तीने स्वतः काढलेला पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला मागा.
  • व्हिडिओ कॉल करून फोटोतलीच व्यक्ती आहे का बघा.
  • गाव, घर, शेजारी व नातेवाईकांकडे प्रत्यक्ष जाऊन चौकशी करा.
  • पहिली भेट दिवसा, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी व घरच्यांसोबत.
  • सगळे कागद समोरासमोर बघा — मोबाईलवरचे फोटो पुरेसे नाहीत.
  • पैशांची कोणतीही मागणी आली तर तिथेच थांबा.
  • लग्न झाल्यावर रीतसर विवाह नोंदणी करा — पुढे हाच कागद संरक्षण देतो.

हुंडा मागणं हा गुन्हा आहे

हुंडा मागणं, घेणं आणि देणं — तिन्ही भारतात गुन्हे आहेत (हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१). फक्त मागणी केली तरी तो स्वतंत्र गुन्हा ठरतो. या वेबसाइटवर हुंड्याचा उल्लेख असलेलं कोणतंही स्थळ लगेच काढून टाकलं जाईल. तुमच्याकडे हुंड्याची मागणी झाली तर स्थळ नाकारा आणि पोलिसांत (११२) किंवा महिला हेल्पलाइन १८१ वर तक्रार करा. जिल्ह्याचे हुंडा प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडेही दाद मागता येते.

वयाचा नियम

वराचं वय २१ वर्षे व वधूचं वय १८ वर्षे पूर्ण असल्याशिवाय लग्न कायद्याने चालत नाही (बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६). त्याखालील वयाच्या स्थळाचा आग्रह कुणी धरत असेल तर स्पष्ट नकार द्या.

फसवणूक झाली तर काय करावं

  • लाज बाळगू नका. पहिले काही तास महत्त्वाचे — लवकर तक्रार केली तर पैसे परत मिळण्याची शक्यता असते.
  • सायबर हेल्पलाइन १९३० वर लगेच फोन करा, किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
  • जवळच्या पोलीस ठाण्यात जा. तातडीसाठी ११२. महिलांसाठी हेल्पलाइन १८१.
  • चॅट, फोटो, नंबर व पैसे पाठवल्याच्या पावत्या — सगळे पुरावे जपून ठेवा.
  • घरातल्या मोठ्या माणसांना लगेच सांगा. एकटं लढू नका.

प्रोफाईलची तक्रार संस्थेला कशी करावी

  • तक्रार निवारण अधिकाऱ्यांना या ईमेलवर लिहा: info@vadarvivah.com. त्यांचं नाव, पत्ता व फोन या पानाच्या शेवटी दिला आहे.
  • तक्रारीत त्या प्रोफाईलचं नाव, लिंक आणि काय घडलं ते थोडक्यात लिहा. पुरावे जोडा.
  • तक्रार मिळाल्याचं २४ तासांत कळवलं जाईल आणि १५ दिवसांत निर्णय सांगितला जाईल.
  • कुणाचा खाजगी फोटो, नग्न फोटो, बदललेला फोटो किंवा तोतयागिरी असेल तर तो २४ तासांत काढून टाकला जाईल.
  • संस्था तपास करू शकत नाही किंवा पैसे परत मिळवून देऊ शकत नाही — त्यासाठी पोलिसांतच जावं लागतं.

शेवटी एकच — संस्था फक्त ओळख करून देते. स्थळाची पडताळणी आणि अंतिम निर्णय तुमचा व तुमच्या कुटुंबाचा.